सकाळी तिकिट नाही, म्हणून दुपारी दुसरीकडे जायचे ! पावणं हे बर नव्हं : शरद पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सकाळी तिकीट मिळाले नाही म्हणून दुपारी दुसरीकडे जायचं, हे धोरण चांगलं नाही. ‘पावणं, हे बरं नव्हं!’ असे मिश्किलपणे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. सुजय विखेंच्या भूमिकेची खिल्ली उडविली.

शेवगाव येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले की, अगोदर गांधी परिवाराला शिव्या घातल्या आता माझा नंबर लागला आहे. बिनपैशाने माझी प्रसिध्दी होतेय. मग मी काय साधासुधा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतील आहे. त्यामुळे अशा लुंग्यासुंग्याने टिका केली, तर मी लक्ष देत नाही.

आपल्या देशात पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या पदव्या सरकारकडून दिल्या जातात. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला न मागता ‘थकबाकीदार’ ही पदवी मिळते. कर्जबाजारी, थकबाकीदार आणि निसर्गाची अवकृपा यामुळे बळीराजा आत्महत्या करतो आहे. मोठमोठ्या थकबाकीदारांची कर्जे माफ केली जातात. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आल्यावर त्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, अशी खंत व्यक्त करतानाच आम्ही देशातील शेतकऱ्यांची ७० हजार कोटीचे कर्ज माफ केले शिवाय व्याजदरही कमी केला होता, याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली.

चार वर्षात एक वीटही रचली नाही

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याच्या जलपूजनाला मोदींनी १८ कोटी रुपये खर्च केले. परंतु शिवाजींच्या नावाने राज्य करणार्‍या या सरकारने चार वर्षात एक वीटही रचली नाही. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वाधिक उंचीचा पुतळा उभारला. परंतु पुतळ्याला जेवढा खर्च आला नसेल, तेवढा खर्च यांच्या जाहिरातीवर व कार्यक्रमावर झाला, असा आरोपही शरद पवार यांनी केला.