बघू… कोण कुस्ती खेळतो ? पवारांचे पद्मसिंहांना खुले ‘आव्हान’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात नव्या नेतृत्वाला अनुकूल परिस्थिती आहे. आपली उत्स्फूर्त उपस्थिती विरोधकांना धडा शिकवायला पुरेशी आहे. राज्याला नवा विचार देण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये आहे. नव्या इतिहासाचे आपण सर्वजण मिळून साक्षीदार होऊया. बघू आपल्यासोबत कोण कुस्ती खेळतो, अशा शब्दांत पद्मसिंह पाटील यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला.

उस्मानाबाद शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवारांनी जोरदार फटकेबाजी करीत डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेलक्या शब्दात फटकारले. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, आमदार सतीश चव्हाण, आमदार राहुल मोटे, आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जीवन गोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यवस्था उलथून जात असताना आपण बघ्याची भूमिका घेणार नाही. माझ्याइतके प्रेम अन्य कोणी केल्याचे उदाहरण दाखवा. सोलापूर येथील सभेत भाजपा अध्यक्षांच्या पायाचे दर्शन काहीजणांनी घेतले.

स्वाभिमानाची नवी व्याख्या आता बघावी लागत आहे, अशा शब्दात राणा पाटील यांचा शरद पवार यांनी समाचार घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीप्रश्न ध्यानात घेवून राज्याच्या पाण्याचे धोरण ठरविण्याचा अधिकार आपण यांना दिला. तो योग्य पध्दतीने राबविता आला नाही, याला आपण कसे जबाबदार? असे सांगत डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कार्य पध्दतीवर शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज्यात यंदा 16 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्याचे उत्तर देण्याऐवजी फडणवीस नको त्या गोष्टीचा प्रचार करीत आहेत. यांच्यात हिशोब देण्याची ताकद नाही. एका बाजूला बेकारी आणि दुसरीकडे मंदी अशा वाईट परिस्थितीतून देश जात आहे. राज्यकर्त्यांना मात्र या प्रश्नांची तसदी घ्यावी वाटत नाही. यांना हिशोब विचारला असता, ते उलट आपल्यालाच प्रश्न विचारतात आणि लोकांचे लक्ष मुख्य प्रश्नांपासून विचलित करतात. आपणाला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे, असे सांगत ज्याने पक्षांतर केले, त्याच्या हातात इतकी वर्षे सगळी सत्ता दिली होती. मग विकास का केला नाही? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.

राणा पाटील बालिश बुध्दीचे!
लहान मुलांचे बोलणे आपण मनावर घेत नाही. राणा पाटील बालिश बुध्दीचे आहेत. पक्षातून कुरघोडी केली जात होती, तर हे जबाबदार नेतृत्वाच्या ध्यानात आणून देण्याचा अधिकार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडे होता. त्यांनी असे केले असते तर त्यांचा सन्मानच करण्यात आला असता. आपण कधीच कोणाच्या दारात गेलो नाही. स्वतः पक्ष स्थापन केला. आघाडीमध्ये मनसेला घेण्यात आमची हरकत नव्हती. काँग्रेसमुळे ते होऊ शकले नाही.

पक्षांतर पत्नीप्रेमापोटी : धनंजय मुंढे
राज्यात पुत्रप्रेमापोटी सगळीकडे पक्षांतर सुरू असताना उस्मानाबाद जिल्ह्यात झालेले पक्षांतर पत्नीप्रेमापोटी झाल्याचा सणसणीत आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केला. यावर कुटूंबातील एवढी बारीक माहिती आपल्याला नाही, असे सांगत शरद पवारांनी हशा पिकविला.