भाजपा आ. गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ जहरी टीकेबाबत फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले… (व्हिडीओ)

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपकडू नुकतेच विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेले गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जहरी टीका केली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. पडळकर यांच्या या विधानामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांच्या या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पडळकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शस्त्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. याबाबत मी गोपिचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. भावनेच्या भरात आपण हे विधान केल्याचे पडळकर यांनी मान्य केलं आहे. याबाबत ते लवकरच स्पष्टीकरण देतील.

धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांची जीभ घसरली होती. शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजांना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम शरद पवार हे करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी पवार यांना लक्ष्य केले होते.

मात्र गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेले विधान भाजपचे अधिकृत विधान नसल्याचे स्पष्ट करत भाजपने या विधानापासून पक्षाला वेगळे केले होते. भाजप नेते अतुल भातखळकर पडळकरांच्या विधानावर म्हणाले की, पडळकरांच्या वक्तव्याशी पूर्णपणे असहमत आहे. शरद पवारांशी वैचारिक मतभेद असले तरी या भाषेत टीका करणं चुकीचं आहे. त्यांच्या वक्तव्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे भातखळकर यांनी स्पष्ट केलं.