सोनिया गांधींसोबत चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी दिला ‘त्या’ चर्चांना पुर्णविराम, म्हणाले – ‘राज्यात सर्व पर्याय खुले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज सायंकाळी दिल्लीत भेट घेतली. दोघांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना महाराष्ट्रात पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का ? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर शरद पवारांनी त्या शक्यतेला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासुन शरद पवार मुख्यमंत्री होऊ शकतात अशा चालू असलेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

भेटीदरम्यान शरद पवारांनी राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. शिवसेनेकडून कुठलाही प्रस्ताव अद्याप आलेला नाही असेही पवारांनी सांगितले. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहे, मी पण राज्यसभेत आहे. ते नेहमी भेटत असतात. त्यामुळे त्यांच्या भेटीदरम्यान वेगळी काही चर्चा झाली नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात भाजपा-शिवसेना युतीकडे बहुमताचा आकडा आहे. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेने लवकरात लवकरच राज्यात सरकार स्थापन करावे आणि जनतेचे प्रश्न सोडवावेत.

राज्यात सध्या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. तो प्रश्न सोडवावा. दरम्यान, पुन्हा एकदा सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचे पवार म्हणाले. त्या भेटीनंतरच आपण म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी नेमकी काय भुमिका घेऊ शकते हे सांगता येईल हे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. मात्र, शरद पवारांनी राज्यात सर्व पर्याय खुले असल्याचे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com