home page top 1

‘शिवरायांनी किल्ले तर सोडाच पण स्वाभिमानासाठी ‘दिल्ली दरबार’ सोडला मात्र आज ?’ शरद पवारांचा उदयनराजेंवर ‘घणाघात’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये केलेला प्रवेश राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत आहे. आज साताऱ्यात झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा दाखल देत उदयनराजे भोसले आणि भाजपवर कडाडून टीका केली.

काय म्हणाले शरद पवार :
सरकारने गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर संधान साधत पवार म्हणाले, “आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अख्ख्या जगाला अभिमान आहे. महाराजांच्या गादीचाही आपल्याला अभिमान आहे. पुरंदर किल्ल्याचा तहावेळी मिर्झाराजे आले पण छत्रपतींनी आपले किल्ले सोडले नाहीत. मात्र या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देण्याचा. आता शौर्याचे प्रतीक असलेल्या आपल्या महाराजांच्या किल्ल्यात छमछम होणार आहे. ”

ते पुढे म्हणाले त्यानंतर छत्रपतींना दिल्लीत बोलावून चुकीची वागणूक दिली गेली. परंतु आपल्या स्वाभिमानाकरिता महाराज तिथून उठून गेले. दिल्लीत स्वाभिमानाला धक्का पोहोचला म्हणून महाराजांनी सहन केले नाही मात्र आज ? असा प्रश्न करत उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला.

सातारकरांना भावनिक साद :
सध्या ज्यांच्या हातात सत्ता आहे ते शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाही. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे. त्यांनी मुलांना शिकवले एक पिढी घडवली मात्र आज काय परिस्थिती आहे. मुलं शिकली आहेत मात्र मुलांना रोजगार नाही. जे काळ्या आईशी इमान राखतात त्यांना जर हे मदत करत नसतील तर यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे पवार म्हणाले. साताऱ्यात आल्यानंतर मोठ्या जल्लोषात स्वागत केले म्हणून त्यांनी सातारकरांचे आभार मानले. त्याचबरोबर आज ती परिस्थिती जन्माला आली आहे त्या सध्याच्या सरकारला पायउतार करून धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचे नाही असे आवाहनही पवार यांनी केले.

Visit :- policenama.com

Loading...
You might also like