शरद पवार अन् दानवेचं ठरलं, ‘या’ कारणासाठी लवकरच PM मोदींना भेटणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदीचा निर्णय जाहिर केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटनांकडून या निर्णयाचा विरोध करत आहेत. कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसणार असल्याने महाराष्ट्रातील सत्ताधारी आणी भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली आहे. या प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव कोरोनाच्या संकटात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय आहे. बाजारातील कांद्याला वाढत्या किमतीच्या आधारावर केंद्राने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. त्यामुळे केंद्राने हा निर्णय रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

महाष्ट्रातील शेतकरी संघटना देखील या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे कांदा निर्यातबंदी हटविण्याची मागणी केली आहे. तसेच याआधी आपलं फोनवरुन संभाषण झालं होतं. मला आशा आहे की, आपण लवकरच योग्य निर्णय घ्याल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला भाव मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आता रावसाहेब दानवे यांनी देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तसेच मंगळवार नंतर शरद पवार आणि माझ्या नेतृत्त्वात एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. किती लोकांना कोरोनामुळे भेटीची परवानगी मिळते हे कळेल. दानवे यांनी ट्विट अकाउंटवरुन शरद पवार यांच्या भेटीचा फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली.