‘या’ पक्षाला महाआघाडी घेण्यासाठी शरद पवार करणार काँग्रेससोबत वाटाघाटी  

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकी जवळ येऊ लागल्याने शरद पवार भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणावर प्रभाव पाडणारा स्वाभिमानी शेतकरी संघटना हा पक्ष महाआघाडीत यावा म्हणून शरद पवार प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने आज पवारांच्या मुंबईतील निवास्थानी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली असून शरद पवार स्वाभिमानीला तीन जागा देण्यासाठी अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बैठकीत शरद पवार यांनी रविकांत तुपकर यांना काँग्रेस सोबत बोलणी करण्याचे आश्वासन दिले आहे. स्वाभिमानी मागणी करत असलेल्या तीन मतदारसंघा पैकी हातकणंगले आघाडी आधीच सोडण्यासाठी तयार आहे. प्रश्न राहतो तो फक्त बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघाचा. त्यापैकी बुलढाणा राष्ट्रवादीकडे आहे तर वर्धा काँग्रेसकडे आहे. म्हणून शरद पवार यांनी आपण काँग्रेस नेत्यांशी बोलून आपणाला या बाबत अंतिम निर्णय कळवतो असे म्हणाले आहेत.

याच बैठकीत राजू शेट्टी हे पुन्हा लोकसभेत निवडून गेले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे असे शरद पवार रविकांत तुपकर यांना म्हणाले आहेत. स्वाभिमानी सोबत आघाडी झाली नाही याचा सर्वाधिक तोटा माढा म्हणजे शरद पवार उमेदवारी करत असलेल्या मतदारसंघात बसणार आहे. बुलढाणा मतदारसंघात रविकांत तुपकर हे स्वतः उमेदवारी करणार आहेत.तर राष्ट्रवादीने या मतदारसंघात विजयाचा चंग बांधला आहे अशा अवस्थेत स्वाभिमानी आघाडीत समाविष्ट झाल्यास बुलढाणा स्वाभिमानीला सोडावा लागणार आहे. दरम्यान आपल्यात बनू लागलेली आघाडी तुटू देऊ नका असे म्हणून शरद पवार यांनी स्वाभिमानीला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.