…आणि शरद पवारांनी अजित पवारांना विचारले – ‘अरे मी काय म्हातारा झालो का?’

चाकण (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – अरे मी काय म्हातारा झालो का? असा मिश्किल सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना केला आहे. साहेबांचं आता वय झालं असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्या वक्तव्याची फिरकी घेत शरद पवार यांनी हे विधान केले आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन चाकण येथे करण्यात आलं होत. या पहिल्याच कार्यकर्त्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेत शरद पवार म्हणाले की , अजितने सांगितलेली एक गोष्ट मला नाही आवडली, साहेबांचं वय झालं…अरे मी काय म्हातारा झालो का ? असा मिष्किल सवाल त्यांनी केला.

पुलवामा हल्ल्याचा बदला माझ्या सल्ल्यानेच –

पुलवामा हल्ल्याबाबत बोलताना एअर स्ट्राइकची कारवाई माझ्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार म्हणाले, पुलवामा हल्ल्यानंतर तातडीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली. तेव्हा मी पूर्वी संरक्षण मंत्री असल्याने पहिला प्रश्न मला विचारण्यात आला, त्यावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश भारतीय जवानांना द्या, असा सल्ला मीच दिला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री सितारामण उपस्थित नव्हते, असेही पवारांनी सांगितले.

मोदींवर टीका-

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते, असे सांगत पवारांनी मोदींवर टीकाही केली होती. पुलमावा हल्ल्यानंतर देशात सीमारेषेवर तणा होता अन् ही ५६ इंचाची छाती यवतमाळमध्ये येऊन बोलत होती, असे म्हणत मोदींना टोलाही लगावला. तसेच मी या देशात परिवर्तन केल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही ते म्हणाले.