राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शरद पवारांनी केला राज्यपालांना दिलेल्या ‘त्या’ पत्राचा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवारांनी राज्यपालांना दिलेल्या त्या पत्राचा खुलासा केला. पवार म्हणाले की आम्ही पत्रात सांगितले होते की आम्ही आघाडीत एकत्र निवडणूक लढलो आहोत. आमच्या मित्रपक्षाशी आम्हाला याबाबत चर्चा करावी लागेल. या चर्चेनंतर आम्ही निर्णय कळवू, त्यासाठी आम्हाला थोडा कालावधी द्यावा. परंतू राज्यपालांनी असे केले नाही.

राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेच्या मुदती आधीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने राज्यपालांना काय पत्र पाठवलं होत यावर चर्चा रंगली होती. त्याचा खुलासा शरद पवार यांनी केला. शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर काय झाले असे विचारले असता पवार म्हणाले की ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’सह अजून अनेक मुद्यावर शिवसेनेशी चर्चा होणे आवश्यक आहे. या मुद्यावर होणाऱ्या स्पष्टीकरणानंतर निर्णय देण्यात येईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेस नेते अहमद पटेल, मलिक्कार्जुन खर्गे आणि वेणूगोपाल यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत काय झाले आणि सत्तास्थापनेबाबत काय निर्णय घेतले याचा खुलासा या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे हॉटेल रिट्रीटवर आमदारांची भेट घ्यायला गेले होते. या बैठकीत शिवसेनेचे आमदार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंना दिलासा देताना सांगितले की तुम्ही येथे बिनधास्त रहा. जे काही होणार आहे त्याकडे माझे लक्ष आहे. परंतू आता राष्ट्रवादीने काँग्रेसने देखील पाठिंब्यावरील निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे. काही मुद्यावर स्पष्टीकरण झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका आघाडीने घेतली आहे. यामुळे राष्ट्रपती राजवटीनंतर आता पुन्हा एकदा राजकीय खलबत सुरु झाली आहेत. या दोन्ही बैठकीत आणि पत्रकार परिषदेनंतर हे स्पष्ट होईल की तीन्ही पक्षांची राणनीति काय असणार आहे.

Visit : Policenama.com