उदयनराजे डॉक्टरांचा ‘तो’ सल्ला आपण दोघे स्वीकारू : शरद पवार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात उपस्थिती लावली होती. त्यावळे त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टरांनी ‘डोके शांत ठेवा’ असा सल्ला दिला आहे, पण तो कोणाला आहे मला माहित नाही, असं वक्तव्य केले. मात्र डॉक्टरांचा हा सल्ला नेमका कोणासाठी होता?, हा चर्चेचा विषय ठरत आहे. साताऱ्यातील एका हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उपस्थिती होती.

उदयनराजे, डॉक्टरांनी आपल्या भाषणात ‘डोके शांत ठेवा’ असे सांगितले आहे. हे कुणासाठी सांगितले हे मला माहित नाही. पण आपण दोघांनी ते स्वीकारू. कारण डॉक्टरांचे मार्गदर्शन आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

हॉस्पिटलच्या कार्यक्रमासाठी गेल्यावर मला अनेक गोष्टींची आठवण होते. मल्टिपरपज हॉस्पिटलसाठी पेशंट ही मल्टिपरपज हवा आहे. तो पेशंट म्हणजे मी स्वतः आहे. कारण मी कॅन्सरला तोंड दिले, डॉक्टरांनी माझे सगळे दात घश्यात घातले. त्यानंतर डॉक्टरांनी मला तुम्हाला स्टेंन बसविण्याची गरज आहे असे सांगितले, मी त्यांना काय बसवायचे ते बसवा असे सांगितले. मी पाय घसरून पडलो त्यावेळी पायात रॉड टाकला. ते पण मी सहन केले. मध्यंतरी हृदयाकडे अशुद्ध रक्त घेऊन येणाऱ्या व्हेनमध्ये अडथळे आले. त्यामुळे त्याचे ही उपचार मी घेत आहे. या सर्वाचा मला अनुभव असल्याने मी मल्टिपरपज आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, साताऱ्यात मल्टिपरपज हॉस्पिटल उभारल्याने मला मनापासून आनंद होतोय. करण हे आपलेच घर आहे, असे मला वाटते. माझा प्रवास सातारा जिल्ह्यात जास्त वेळा असतो. त्यामुळे एक चांगले हॉस्पिटल काढले आणि एक सामाजिक भान ठेऊन काढले याचा आनंद आहे, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.