शिवसेना खा. राऊत यांचा काँग्रेसला सल्ला, म्हणाले – ‘शरद पवारांचं सांगणं हे मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानानं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या नाराजीच वातावरण आहे. “हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करण टाळावं,” असा इशाराच महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांचं नाव न घेता मित्रपक्षांच्या नेत्यांना दिला होता. यावर भाष्य करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला राजकीय सल्ला दिलेला आहे.

काँग्रेसनं चिंतन केलं पाहिजे; शिवसेना खासदार राऊत यांनी काँग्रेसला दिला सल्ला…
राहुल गांधी यांनी कामाला लागावं. काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. परंतु, ते काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. हैदराबादमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली नाही. त्याउलट भाजपा ४ वरून ५०च्या आसपास पोहोचला. हे त्यांचं यश आहे. निकालाची पर्वा न करता काँग्रेसनं झोकून देऊन काम करायला हवं. लोकांना जेव्हा काम दिसेल. तेव्हा लोक तुमच्या पाठिशी उभे राहतील.

सगळ्यांनाच पंडित नेहरू होता येत नाही. सगळ्यांनाच नरेंद्र मोदी होता येणार नाही. सगळ्यांना शरद पवार होता येणार नाही. प्रत्येकाच्या नेतृत्वाच्या आपल्या मर्यादा असतात. मोदींच्याही आहेत. मला असं वाटतं की, शरद पवारांची जी भूमिका आहे, शरद पवारांचं सांगणं, हे त्यांच्यापेक्षा अनुभवानं कमी असलेल्या कुणीही फक्त राहुल गांधीच नाही, तर कुणीही मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं. ते जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा एक अभ्यास असतो. राहुल गांधी यांच्या बाबतीत अशी विधान वारंवार होत असतात. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा मी सगळ्यात मोठा समर्थक आहे अशा वेळेला ज्या सातत्याविषयी शरद पवार बोलत आहेत.

दांडगा अनुभव शरद पवारांचा असेल, तर सगळ्यांनी आपला अंहकार आणि इगो विसरून आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेता आपल्याला काही सांगत असेल, तर आपण त्या भूमिकेत शिरायला पाहिजे. आम्हीसुद्धा अनेकदा पवारांचं मार्गदर्शन घेतो. मुख्यमंत्री घेतात. ते सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. सातत्यानं काही लोक असं बोलत असतील. त्यांचं नेतृत्व उभंच राहू नये. राहुल गांधी कुठेही मेहनतीत कमी पडत नाहीत. त्यांना नशीब आणि भाग्य साथ देत नाही. काँग्रेसनं चिंतन केलं पाहिजे. मी त्यांच्या पक्षाविषयी बोलू शकतो. पण मला असं वाटतं की, काँग्रेसला राहुल गांधींशिवाय पर्यायचं नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वाला तडे जावेत. त्यांचं प्रतिमाभंजन व्हावं, यासाठी भाजपाकडून कसोशीने प्रयत्न केले जातात. काँग्रेसनं चिंतन केलं पाहिजे.