दुष्काळाचे सावट, ऊसाऐवजी बीट लावा पवारांचा सल्ला 

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन  – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे ऊस उत्पादकांचे आणि कारखानदारांचे नेते म्हणून शरद पवार यांची खास ओळख आहे.  ऊस हे पीक असे आहे की ज्याकरिता १२ महिने पाण्याची गरज असते पण आत्ताची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत शेतीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. म्हणूनच शरद पवार यांनी ऊसाऐवजी बीट लावण्याचा सल्ला दिला आहे.
 दुष्काळ आला की ऊसाच्या पिकांची चर्चा सुरु होते. ऊसावरच्या कोणत्याही टीकेला शरद पवारच उत्तर द्यायचे. पण यंदा बारमाही पाणी पिणाऱ्या ऊसाला आता शरद पवारांनीच पर्याय सुचवला आहे.साखरेच्या उत्पादनासाठी युरोपभर बीटचा वापर केला जातो. बीट आणि ऊसाच्या लागवडीमध्ये खर्चात फारसा फरक नाही. ऊस बारा महिन्यांचे पीक, तर बीट चार महिन्यांचे. ऊसाच्या तुलनेत बीटमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे. बीट पिकाला ऊसापेक्षा कित्येक पटीने कमी पाणी लागतं, असं पवार म्हणाले.
बारामतीच्या कृषी विकास केंद्राने बीट लागवडीचा प्रयोग गेल्या वर्षी केला. आपल्या वातावरणात टिकतील अशा बीटच्या सात वाणांची लागवड केली. एकरी पस्तीस ते चाळीस टन उत्पादन आलं.सह्याद्रीच्या डोंगर रांगानी महाराष्ट्राची विभागणी केली आहे. शंभर वर्ग किलोमीटरचा प्रदेश पर्जन्य छायेचा बनला आहे. त्यामुळे असे पर्याय शोधावे लागणारच.
राज्यात ऊस उत्पादन घटणार 
राज्यातील साखर हंगामाला येत्या ऑक्‍टोबरपासून प्रारंभ होत आहे. मान्सूनने दिलेले दगा त्यामुळे राज्यावर असणारे दुष्काळाचे ढग त्यातच उसाच्या बहुसंख्य क्षेत्रावर झालेला हुमणी रोगाचा प्रार्दुभाव यामुळे राज्यात यंदा साखरचे उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. उसाचे उत्पादन क्षेत्र वाढले असले तरी साखर निर्मिती मात्र कमी होणार आहे.
गतवर्षीच्या गळीत हंगामा (2017-18) मध्ये राज्यातील 199 साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले होते. महाराष्ट्रात हंगामाच्या सुरूवातीला 15 लाख मे.टन साखरेचा शिल्लक साठा व हंगाम 2017-18 मधील उत्पादन 107.08 लाख टन साखर उपलब्ध होती. या उत्पादित साखरेपैकी राज्यात अंदाजे 24 लाख मे. टन साखरेचा खप व महाराष्ट्रातून सुमारे 50 लाख मे. टन साखर परराज्यात दिली तसेच तीन लाख मे. टन साखर निर्यात होण्याची अपेक्षा आहे. अशी एकूण 77 लाख मे. टन साखर विक्रीच्या धर्तीवर हंगामाच्या शेवटी 40 लाख मे. टन साखर शिल्लक राहील असे चित्र आहे. त्याचबरोबर चालू गळीत हंगामात उसाचे क्षेत्र वाढल्याने पुन्हा साखरेचे निर्मिती जास्त होणार असे चित्र दिसत होते, याबाबत अंदाज वर्तविताना साखर आयुक्तालयाने यंदा 110 मेट्रीक टनापेक्षा जास्त साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज काढला होता. पण मान्सूनने दिलेल्या हुलकावणीमुळे सगळेचे अंदाज फोल ठरले. म्हणजे क्षेत्रफळ वाढले पण साखरेचे उत्पादन घटणार असेच सध्या दिसत आहेत.