ऊसाऐवजी बीट लावा, पाणीबचतीसाठी शरद पवारांचा सल्ला

उस्मानाबाद : पोलीसनामा आॅनलाईन – यंदा मराठवाडा दुष्काळाने चांगलात होरपळताना दिसत आहे. पावसाने यंदा पाठ फिरवल्याने अनेक भागात पाणी प्रश्न डोकावू लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना याचा जास्त फटका बसतो आहे. शेतीचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना एक सल्ला दिला आहे. ऊसाऐवजी बीट लावण्याचं पवारांनी सुचवलं आहे.

ऊसाचे पीक म्हणजे बारमाही पाणी पिणारे पीक अशी ऊसाची आेळख आहे. त्यातही  ऊस उत्पादकांचे आणि कारखानदारांचे नेते अशीच शरद पवार यांची खास ओळख आहे. दुष्काळ आला की, बहुतेक करून ऊसाच्या पिकांचीच चर्चा होताना दिसते. महत्त्वाचे म्हणजे ऊसावरच्या कोणत्याही टीकेला शरद पवारच उत्तर द्यायचे. अशाच बारमाही पाणी पिणाऱ्या पिकाला आता शरद पवारांनी चांगलाच पर्याय सुचवला आहे.

बहुतांश करून साखर उत्पादनासाठीच ऊसाचा उपयोग केला जातो. मग साखरेचाच प्रश्न असेल तर ऊसाच्या तुलनेत बीटमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे बीट आणि ऊसाच्या लागवडीमध्ये खर्चात फारसा फरक नाही. इतकेच नाही तर ऊस बारा महिन्यांचे पीक आहे तर बीट चार महिन्यांचेच आहे. साखरेच्या उत्पादनासाठी युरोपभर बीटचा वापर केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा विचार जर केलाच तर ऊसापेक्षा कित्येक पटीने बीट पिकाला कमी पाणी लागतं, असं पवार म्हणाले.

विशेष म्हणजे गेल्याच वर्षी  बारामतीच्या कृषी विकास केंद्राने बीट लागवडीचा प्रयोग केला आहे. आपल्या वातावरणात टिकतील अशा बीटच्या सात वाणांची यशस्वी  लागवड करण्यात आली. या लागवडीतून  एकरी पस्तीस ते चाळीस टन उत्पादनही आलं. सह्याद्रीच्या डोंगर रांगानी महाराष्ट्राची विभागणी केली आहे. शंभर वर्ग किलोमीटरचा प्रदेश पर्जन्य छायेचा बनला आहे. त्यामुळे असे पर्याय शोधावे लागणारच.