‘भाजपाच्या हातात सत्ता देणे शिवसेनेच्या हिताचे नाही’ : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीचे काही भाग संजय राऊत यांच्याकडून ट्विट केले जात आहेत. यात मुलाखतीचा चौथा प्रोमो प्रसिद्ध केला आहे. यात संजय राऊत यांनी ठाकरे सरकारचं भविष्य काय? राष्ट्रवादी आणि भाजपची सत्तेसाठी बोलणी झाली होती का? यावर प्रश्न विचारलेत.

यावेळी शरद पवार यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. भाजपच्या हातात सरकार चालवायला देणे हे शिवसेनेच्या हिताचे नाही, राज्यात सेंट्रल ऑफ पॉवर एकच असली पाहिजे. तसेच पार्लांमेटमध्ये नरेंद्र मोदी यांच्या चेंबरमध्ये जाऊन काय संवाद झाला?, याबाबतही पवार यांनी मुलाखतीत खुलासा केला आहे.

उद्यापासून ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. शरद पवार यांच्या या मुलाखतीच्या प्रोमोमुळे उत्कंठा वाढलीय. दरम्यान, बुधवारी या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध झाला आहे त्यात महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?’ असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्कंठा वाढवणारा ठरला. शरद पवार यांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल, अशी मुलाखत होणे नाही, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.

‘शरद पवार यांची मुलाखत घेण्याचे अगोदर ठरले होतं. शरद पवार हे महाराष्ट्रासह देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरविले, बदनामीकारक विधानं केली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. पण, मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,’ असे संजय राऊत यांनी म्हटले होते.