Sharad Pawar : शरद पवारांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आज पित्ताशयावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.

पोटदुखीच्या तक्रारीनंतर मागील महिन्यात शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पित्ताशयातील खडा हे त्यांच्या पोटदुखीचं कारण असल्याचे तपासणीत समोर आले होते. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर 30 मार्च रोजी रात्री पवारांवर एन्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर 3 एप्रिलला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र, दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी त्याचवेळी स्पष्ट केले होते. त्यानुसार रविवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज सकाळी शरद पवार यांच्यावर लॅप्रोस्कोपी करण्यात आली. डॉ. बलसारा यांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर पवारांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे, असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.