शरद पवारांनी भाजप नेत्यांचा ‘तो’ डाव त्यांच्यावरच ‘उलटवला’, BJP नेत्यांचा ‘तिळपापड’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजप सरकार सत्तेत असताना मोहिते पाटील यांनी बारामतीचे पाणी बंद करून शरद पवार यांना शह दिला. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ता समिकरणं बदलली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांना आघाडी सरकारनं स्थगिती दिली. बारामतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या नीरा डाव्या कालव्याचा निर्णय देखील आघाडी सरकारने रद्द केला. यामुळे भाजप नेत्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवण्यात शरद पवारांना यश आले आहे.

निरा-देवघरचे पाणी बारामतीला शरद पवारांनी वळवले असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन भाजप सरकारला ते पाणी बंद करण्यास खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाग पाडले होते. त्यावेळी यावरून मोठे राजकीय वातावरण तापले होते. मात्र आता राज्यातील सत्तासमिकरणं बदलली असून ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर नीरा डाव्या कालव्याचे पाणी पुन्हा एकदा बारामतीसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयावर माढा मतदारसंघातील नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे हा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर दुष्काळी भागातील हक्काच्या पाण्यावर पुन्हा एकदा ‘दादा’गिरी होत असल्याने यावरून राजकारण तापले असून बेकायदेशीर पाणी वापरास आपला विरोध असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. तर हा निर्णय अधिकृत आहे का नाही हे पाहून निर्णय घेऊ मात्र मुख्यमंत्री हे आमच्यावर अन्याय करणार नाहीत, अशी भूमिका सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी घेतली आहे.