शरद पवारांना आपला पराभव दिसला म्हणून त्यांनी माघार घेतली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माढा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतली आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांना आपला पराभव समोर दिसला असेल म्हणून त्यांनी माघार घेतली असावी, असे विधान राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

याबाबत बोलताना सुभाष देशमुख म्हणाले, ‘पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय हा भाजपचा पहिला विजय आहे. शरद पवारांना आपला पराभव समोर दिसला असेल म्हणून त्यांनी माघार घेतली असावी’ असे वक्तव्य  देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतानाच हे सांगितले होते की “मी पराभवाच्या भीतीने माघार घेत नाहीय तर एकाच कुटुंबातील जास्त उमेदवार नको म्हणून मी माघार घेत आहे. त्यासोबतच नव्या पिढीला संधी द्यावी हा हेतू आमचा आहे”. पवारांनी असे स्पष्ट केल्यानंतरही भाजप नेत्यांनी मात्र पवारांची माघार हा भाजपाचा विजय आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

देशात मोदींचीच हवा, शरद पवारांना बदललेल्या हवेचा अंदाज येतो : मुख्यमंत्री
देशात सध्या मोदींचीच लाट आहे. शरद पवारांना याचा अंदाज आलेला आहे. त्यांना बदललेल्या हवेचा अंदाज कळतो. त्यामुळेच शरद पवारांनी माढातून माघार घेतली आहे. त्यांची माघार हा युतीसाठी मोठा विजय आहे. असं विधान मुख्यमंत्र्यांनी मुंबईत केले. राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माढातून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यांनी आपण भीतीने माघार घेत नसून एकाच कुटुंबातील जास्त उमेदवार नकोत म्हणून माघार घेत असल्याचे सांगितले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रीया दिली. मुख्यमंत्री म्हणाले, देशात सध्या मोदींचीच लाट आहे आणि शरद पवारांना बदललेली हवा कळते. त्यामुळेच त्यांनी माढातून माघार घेतली आहे. त्यांची माघार ही युतीसाठी मोठा विजय आहे.