शरद पवार पुन्हा जाणार रुग्णालयात; ब्रीच कँडीमध्ये शस्त्रक्रियाही होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना पु्न्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्यावर 12 एप्रिल रोजी पित्ताशयाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

शरद पवार यापूर्वी जेव्हा रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हा पित्ताशयातील खड्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेसाठी पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार ते आता 11 एप्रिल रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही केली जाणार आहे.

दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, केंद्रीयमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यावेळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असून, ते रविवारी रुग्णालयात दाखल होणार आहेत.