शेतकऱ्यांच्या व मदतनिधीसाठी खासदार शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान मोदींची भेट घेणार : शरद पवार

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केंद्राकडे मदतीची मागणी करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याला मर्यादा, मदतनिधीसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार
सास्तुर, उमरगा, तुळजापूर, परांडा, कळंब, उस्मानाबाद परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारपुढे मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहीजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसंच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर इथं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवार यांनी ही माहिती दिली आहे.

अतिवृष्टीमुळं पिकांसह शेतातील मातीही वाहून गेली आहे. हे संकट मोठं आहे. सरकारची सर्व ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी लावू, असं आश्वासन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळं राज्यातील खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, केंद्राकडे मदतीची मागणी करणार असल्याची माहिती पवारांनी दिली. येत्या 10 दिवसात आपण दिल्लीला जाणार असल्याचंही पवार म्हणाले.

अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान मोठं आहे. या संकटावर एकत्रितरित्या मात करायला हवी. आपण भूकंपासारख्या संकटाला तोंड दिलं आहे, त्यामुळं धीर धरा, अशा शब्दात पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना काय देता येईल हे आज लगेच सांगता येणार नाही. पण पिकांचं झालेलं नुकसान, दगावलेली जनावरं आणि घरांची झालेली पडझड यासाठी सरकार नक्की मदत करेल, असं आश्वासनही पवारांनी शेतकऱ्यांना दिलं.

शरद पवारांची बळीराजाशी ‘मन की बात’
शरद पवार यांनी आज तुळजापूरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत. कांकाब्रा ते सास्तुरा दरम्यान शरद पवार यांना तीनवेळा रस्त्यात गाडी थांबवावी लागली. या गावांना भेटी देताना शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली. तेव्हा लोहारातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. या शेतकऱ्यांच्या हातात पावसात भिजल्यामुळे वाया गेलेली पिके होती. ही पिके शेतकऱ्यांनी शरद पवार यांना दाखवली. आम्ही दुबार पेरणी केली, पण पावसामुळे ती वाया गेली. त्यामुळे आता किमान पुढील पेरणीआधी पंचनामे होऊन आम्हाला आर्थिक मदत द्या, असे शेतकऱ्यांनी शरद पवार यांना सांगितले. यावर शरद पवार यांनी पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या नुकसानीची नीट माहिती द्या, अशी सूचना शेतकऱ्यांना दिली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राज्य परीवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे,राष्ट्रवादी युवकचे महेबुब शेख, प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुका धैर्यशील पाटील नांदुरीकर, संजय निंबाळकर, कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन सुनिल चव्हाण, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, आदीत्य गोरे, तारेख मिर्झा, संजय दुधगावकर, अमित शिंदे, गोकुळ शिंदे, माजी नगरसेवक धनंजय पाटील, महेंद्र धुरगुडे आदी उपस्थित होते.