पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार ! करणार 2 दिवसांचा पाहणी दौरा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळं पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीनं अनेक नद्यांना पूर आला. पुणे जिल्ह्यात पुरात वाहून गेल्यानं चौघे मरण पावले. सोलापूरात 14 जणांचा बळी गेला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचं चित्र असून अनेक भागात शेतीही पाण्याखाली गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मराठवाडा दौरा होणार आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर माजी कृषीमंत्री लवकरच पोहोचणार आहेत.

शरद पवार 2 दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा आणि उस्मानाबाद या भागांना भेटी देणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, 18 व 19 ऑक्टोबर रोजी 2 दिवसांचा हा पाहणी दौरा असणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना शरद पवार यांच्या दौऱ्यातून काहीतरी हाती लागेल अशी अपेक्षा आहे.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसानं कहर केला आहे. शेतात कापणीला आलेली उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचं मोठं नुकसान झालंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा व त्यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं 3 दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. प्राथमिक अंदाजानुसार 23 जिल्ह्यांमधील काढणीवर आलेल्या साडेचार लाख हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं. सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तूर, भात यांच्यासह कापसाचंही नुकसान झालं आहे.

उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या 4 ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तैनात केल्या आहेत. वायुसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनुष्यहानी टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.