‘त्या’ अफवा फेटाळण्यासाठी संतापलेल्या शरद पवारांनी लिहिली फेसबुक ‘पोस्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवार यांच्या नावाने शेतकऱ्यांची थट्टा करणारे फेक मेसेज सोशलमिडीयातून प्रसारित केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच संतापले आहेत. शरद पवार यांची बदनामी करण्यासाठी असे मेसेज जाणूनबुजून पसरविले गेले आहेत.

शरद पवार यांनी फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करून लिहिले की, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांचा मोबाइल माझ्यातर्फे मोफत रिचार्ज करून दिला जाईल, अशी अफवा व्हॉट्सअ‍ॅप फेसबुक सारख्या सोशल माध्यमावरून पसरत असल्याचे मला समजले. काही समाजकंटकांनी पीडित शेतकऱ्यांची केलेली ही क्रूर चेष्टा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करून मी असे कृत्य करणाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो. असे लिहीत पवार यांनी सायबर यंत्रणेने तात्काळ तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी देखील केली आहे.

राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांची प्रतिमा मलीन करण्याचा उद्देश असल्याचे या मेसेजवरून लक्षात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वीच सोशलमिडीयावरून विष पसरवू नका असे आवाहन केले होते. विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर सर्व पक्षांचे आयटी सेल कार्यरत झाले आहेत. अशा आयटीसेलकडून देखील नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातो.

आरोग्यविषयक वृत्त