जेव्हा पीडित कुटुंबाला शरद पवार म्हणतात… कर्ज फेडू नका, मी बघतो !

बीड : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या बीड जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यांनी जिल्ह्यातील खडकत गावापासून दुष्काळी दौरा सुरु केला. यावेळी पवारांनी चार ठिकाणी थांबत शेतकऱ्यांची विचारपूस आणि चर्चा केली. इमनगावमधील कांदा उत्पादक शरद साबळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समजताच शरद पवार त्यांच्या घरी पोहचले. शरद पवारांना पाहून साबळे कुटुंबाने ‘कर्ज कसे फेडायचे’ हा प्रश्न शरद पवार यांच्यापुढे मांडला.

यावेळी शरद पवार आणि धनंजय मुंडे अचानक भेटीला आल्याने पीडित कुटुंबाने एकच हंबरडा फोडला. यावेळी साबळे कुटुंबाने कर्ज कसे फेडायचे याची चिंता व्यक्त केली. यावेळी पवार यांनी कर्ज फेडू नका आम्ही पाहून घेतो. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं म्हणत त्या कुटुंबाला धीर दिला. त्यानंतर शरद पवार पुढील ठिकाणी रवाना झाले. याच दौऱ्यात राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांच्या मळ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना धनुभाऊला मुख्यमंत्री करा असं एका आजोबांनी म्हटलं आणि सभेत एकाच जल्लोष झाला. आजोबांनी हे वाक्य उच्चारल्यानंतर शरद पवार यांनीही त्याला होकार देत या आजोबांचे मन राखले.
दरम्यान, या दुष्काळी दौऱ्यात शरद पवारांसह धनंजय मुंडे, रोहित पवार यांनी देखील सहभाग घेतला होता.