शिवसेनेला पाठिंबा देण्यास अशा तयार झाल्या सोनिया गांधी, शरद पवारांनी उघडलं ‘गुपित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात या विधानसभा निवडणुकांत जे कधी स्वप्नातही घडेल असे वाटत नव्हतं ते घडलं. हे राजकीय नाट्य फक्त महाराष्ट्राने नाही तर संपूर्ण देशाने पाहिलं. एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात तेव्हा राजकारणात कधी काय होईल हे सांगणं खरंच खूप अवघड असतं हे विधान येथे खरं ठरतं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नवीन सरकार स्थापन झालं. या नवीन सरकारची धुरा उद्धव ठाकरेंच्या हातात सार्वमताने सोपवण्यात आली. राजकारणात सारे काही शक्य असते याची प्रचिती यावरून येथे आली.

हे सर्व राजकीय नाट्य घडविण्याचे श्रेय जर खऱ्या अर्थाने कुणाला जाईल तर ते म्हणजे महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना होय. त्यांनी मागील काही घडलेल्या घटनांचा पहिल्यांदाच खुलासा केला आणि सर्वात महत्वाचं आणि मोठं काम त्यांनीच पूर्ण केले, ते म्हणजे सोनिया गांधी यांचे मन वळविणे. शरद पवारांनी आपलं सर्व कौशल्य पणाला लावून सोनिया गांधींना कसं वळवलं हे पवारांनी पहिल्यांदाच स्पष्ट केलंय. शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा आदेश दिला होता. तो आम्हाला मान्य ही होता. आम्ही विरोधक म्हणून विरोधी बाकावर बसण्यास तयार आहोत असंही सांगितलं होतं. मात्र निकालानंतर चित्र बदललं. भाजप आणि शिवसेनेचं मुख्यमंत्री पदावरून खटके उडत असून त्यांच्यात जमत नाही हे पुढे येत होतं. यामुळे भाजपमध्येही असंतोष निर्माण झाला होता.

दरम्यान महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपाकडून डावलण्यात येते ही भावना देखील पसरली होती. विशेष म्हणजे आपण कायमच दुय्यम भूमिका घ्यायची का ? असा प्रश्न देखील शिवसेनेच्या काही नेत्यांना पडला होता. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असं नेत्यांना सतत वाटत होतं. त्यानुसार घटना घडत गेल्या. अशी माहिती शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

शिवसेनेकडून एकत्र येण्यासंबंधीच्या हालचाली सुरु झाल्यानंतर मी थेट सोनिया गांधींना जाऊन भेटलो आणि त्यांना विश्वास दिला. तसेच महाराष्ट्रभर माझ्या प्रचारामुळे काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना फायदा झाला आणि ते नेते माझ्या संपर्कात होते. तसेच माझ्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आस्था देखील होती. त्यामुळे काँग्रेमधील एक मोठा वर्ग भाजपविरोधात एकत्र येण्यास तयार झाला होता.

काँग्रेस पक्षाचे बरेच नवे आमदार हे भाजप विरोधात एकत्र येण्यास इच्छुक होते. देशात नवा पॅटर्न राबवून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही नेहमी पुढे असणार असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांची ही तयारी असल्यामुळे आम्ही अजून पुढे जाऊ शकलो. त्यामुळे आता एकमेव प्रश्न होता तो म्हणजे काँग्रेसच्या दिल्लीमधील नेतृत्वाचा म्हणजेच सोनिया गांधींचा. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना वाटत होते की सोनिया गांधी यांच्याशी मीच बोलावं म्हणून मला त्यासाठी पुढाकार घ्यावा लागला असे देखील त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस आधीपासूनच कट्टर विचाराविंरुद्ध लढत येणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत कसं जायचं असा त्यांना मोठा प्रश्न होता आणि जवळजवळ आघाडी होणे अशक्य होते. परंतु आणीबाणीच्या काळात शिवसेनेने काँग्रेसला साथ देऊन बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींना समर्थन दिलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक झाली त्या निवडणुकीत बाळासाहेबांनी एकही उमेदवार उभा केला नाही आणि ही त्या काळातील सर्वात मोठी गोष्ट होती. तसेच प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असतानाही शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दर्शविला होता. हे सगळं मी सोनिया गांधींना सांगितलं होतं. त्यांनी या सर्व गोष्टींवर विचार केला आणि अखेर त्या तयार झाल्या असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

Visit : policenama.com