शरद पवारांचा ‘हा’ चाहता करतो गेल्या 22 वर्षांपासून निलंगा ते काटेवाडी ‘सायकल’ प्रवास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या चाहत्यांची महाराष्ट्रातच काय पण देशभरात कमी नाही. विधानसभेत तर ’80 वर्षांचा योद्धा’ म्हणून शरद पवार चांगलेच चमकले. सुजलेल्या पायांनी पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. पावसात दिलेल्या भाषणाने तर राज्यात सत्तापालट झाला. सध्या सोशल मिडियावर शरद पवारांच्या एका 62 वर्षीय चाहत्याची कथा व्हायरल होत आहे.

12 डिसेंबरला शरद पवारांचा 80 वा वाढदिवस आहे. राजकारणातील या पैलवानाला शुभेच्छा देणारे पोस्टर गावागावात, रस्त्यारस्तांवर दिसू लागले आहेत. राज्यात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर निलंगा ते बारामती असा प्रवास करणाऱ्या चाहत्यांचा फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

अब्दुल गनी खडके हे गेल्या 21 वर्षापासून निंलगा ते काटेवाडी असा सायकलवरुन प्रवास करत आहे, ते ही शरद पवारांच्या वाढदिवशी. गेली 21 वर्ष ते हा प्रवास करुन शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी जातात. 62 वर्षी गनी हे गनी मामू म्हणून निलंग्यात ओळखले जातात. त्यांची एक विनाअनुदानित उर्दु शाळा आहे. 5 वी पर्यंत या शाळेत शिक्षण मिळते. शाळा जरी स्वत:ची असली तरी त्यांची परिस्थिती सर्वसामान्य आहे, कारण त्यांची शाळा अजूनही विनाअनुदानित आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शाळेचे नाव देखील शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा असे आहे.

यंदा देखील गनी मामू शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी काटेवाडीकडे निघाले आहेत. त्यांचा हा सायकलचा प्रवास 1988 पासून सुरु आहे. यंदाचे त्यांचे हे 22 वे वर्ष. या 22 वर्षांच्या काळावधीत शरद पवारांची आणि त्यांची मागील वर्षी म्हणजेच 2018 साली फक्त एकदा भेट झाली. तेव्हा पवारांनी त्यांचे मनापासून स्वागत केले, असे गनी मामूंचे मित्र सुधीर मसलगे यांनी आठवणीत सांगितले.

गनी मामूंचे हे शरद पवार यांच्याप्रती असलेले प्रेम फक्त निलंग्यात नाही तर लातूर जिल्ह्यात चर्चेचे आहे. दर वर्ष 22 वर्षापासून ते न चूकता शरद पवारांच्या वाढदिवसी त्यांना भेटायला जातात. दरवर्षी 7 डिसेंबरला ते सकाळी 7.30 वाजता निलंगाहून शहरातील शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला हार घालून, वंदन करुन प्रवासाला सुरुवात करतात. निलंगातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी ते काटेवाडीला निघताना उपस्थित होते.

गनी मामूंवर शरद पवारांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव आहे. पवारांनी स्थापन केलेल्या एस काँग्रेसपासून ते पवारांचे निष्ठावंत समर्थक आहेत. विशेष म्हणजे गनी मामूंमुळेच निलंग्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवात झाली. तेव्हा पासून ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करतात. नेतेपदाचा लोभ त्यांना नाही. यावर्षी राष्ट्रवादीकडून शरद पवारांचा वाढदिवस अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त बळीराजाला समर्पित करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शुभेच्छुकांनी पुष्पगुच्छ किंवा हार आणणे टाळावे असे सांगण्यात आले आहे. त्याऐवजी राष्ट्रवादीकडून आवाहन करण्यात आले आहे की स्वयंप्रेरणेने त्या खर्चाच्या निधीचे ‘कृषी कृतज्ञता कोषा’साठी योगदान द्यावे.

Visit : Policenama.com