…म्हणून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिलाच दौरा रद्द !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मंत्री एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांनी भाजपला ( BJP) राम राम करत राष्ट्रवादीत ( NCP) प्रवेश केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांचा पहिलाच खान्देश दौरा आयोजित करण्यात आला होता. पण सोमवारी अचानक हा दौरा रद्द करण्यात आला. तसेच हा दौरा काही दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. शेकडो कार्यकर्ते हे भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीची उत्तर महाराष्ट्रावरील पकड आता मजबूत होणार आहे. त्यामुळे शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा आयोजित केला होता.

शरद पवार हे या दौऱ्यातून भाजपच्या गडात शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत होते, पण सोमवारी रात्री हा दौरा अचानक रद्द करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे ( Rohini Khadse) यांना कोरोनाची लागण झाली आहे. 15 नोव्हेंबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना तातडीनं जळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे एकनाथ खडसे यांना क्वाॅरंटाइन करण्यात आले आहे. म्हणून शरद पवार यांचा हा दौरा सध्या तरी रद्द करण्यात आला आहे. रोहिणी खडसे यांनीसुद्धा भाजपला राम राम ठोकत वडील एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. रोहिणी खडसे या जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी सक्रिय असतात. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता.

या दरम्यान एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शेकडो भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जळगाव जिल्ह्यातील भाजपचे आजी-माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या दौऱ्यात हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण हा दौरा रद्द करण्यात आला व कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला. अद्याप तरी हा दौरा रद्द झाल्याची अधिकृत घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली नाही. मात्र, एकनाथ खडसे हेच क्वाॅरंटाइन असल्यामुळे शरद पवारांना दौरा पुढे ढकलावा लागणार आहे.