कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांच्या चौकशीबाबत सरकार अनभिज्ञ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे की नाही याबाबत माहित नसल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांना चौकशीसाठी बोलवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या चौकशी आयोगाने शरद पवार यांना चौकशीसाठी बोलवावं अशी मागणी होत होती. तसं त्यांना बोलवण्यात येणार आहे का ? असा प्रश्न विधान परिषदेत आमदार विनायक मेटे यांनी विचारला. यावर देशमुख यांनी ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतली. राज्य सरकार एकीकडे या प्रकरणावर कानावर हात ठेवत असताना आमदार विनायक मेटे यांनी आयोगाचे वकील आशीष सातपुते यांनी मात्र शरद पवार यांना चौकशी आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले जाईल असे म्हटल्याची माहिती दिली.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाला महाविकास आघाडी सरकारनं अहवाल सादर करण्यासाठी 8 एप्रिलपर्यंतची शेवटची मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणी विवेक मंच या सामाजिक संस्थेचे सदस्य सागर शिंदे यांनी शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी करणारा अर्ज आयोगापुढे सादर केला होता. त्यासाठी त्यांनी 2018 मध्ये पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याचा आधार घेतला होता.

शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये, उजव्या विचारांचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमा परिसरातील वातावरण वेगळं तयार केल्याचा आरोप केल्याचे शिंदे यांनी अर्जात म्हटले आहे. तसेच पुणे पोलीस आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचं शिंदे यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे शरद पवार यांची चौकशी आवश्यक असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.