भीमा कोरेगाव : NIA च्या चौकशीवर शरद पवारांचा ‘आक्षेप’, तत्कालीन सरकारला ‘सत्य’ बाहेर येण्याची ‘भीती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आल्याने आता यावर राज्य सरकार आक्रमक झाले आहे असे दिसते. आता शरद पवार यांनी आक्षेप घेतला असून कायदा सुव्यवस्था राज्य सरकारचा विषय आहे असे सांगितले. घटनेने राज्याला कायदा सुव्यवस्थेचे आधिकार दिले आहेत त्यात हस्तक्षेप करायचा नसतो. त्यांनी तो केला असे त्यांनी केंद्र सरकारला सुनावले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानसभेतील वक्तव्याचा हवाला दिला. ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री विधानसभेत कधी म्हणले नाहीत की संशयित माओवादी होते. अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही. एल्गार परिषदेत अन्यायाविरोधात तीव्र भाषणं झाली. प्रकरणाचा फेर तपास झाला पाहिजे.

एनआयएच्या चौकशीवर पवारांनी आक्षेप घेत सांगितले की, कायदा सुव्यवस्था राज्य सरकारचा अधिकार आहे. घाई घाईने राज्य सरकारकडून केस का काढून घेण्यात आली असा सवाल पवारांकडून केंद्र सरकारला करण्यात आला आहे. सत्य बाहेर येईल या भीतीने एनआयएकडे तपास सुपूर्त करण्यात आल्याचा आरोप शरद पवारांनी केंद्र सरकारवर केला.

एल्गार परिषदेत करण्यात आलेल्या अटकेवर पवारांनी आक्षेप घेतला आहे, पवार म्हणाले की कविता वाचली म्हणून अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी तारतम्य ठेवले नाही. घटनेने राज्याला कायदा सुव्यवस्थेचा अधिकार दिला आहे तर त्यात हस्तक्षेप करायचा नसतो. पण ठीक आहे, त्यांनी ते केले.
आपल्याला टार्गेट केलं जात आहे का असे विचारल्यावर पवारांनी कोपरखळी मारणारं उत्तर दिलं. ते म्हणाले की मला कोणी टार्गेट केलं नाही आणि केलं तरी मला फरक पडत नाही.

फेसबुक पेज लाईक करा –