शरद पवार यांचे राजकारण संपविणार ; भाजपच्या ‘या’ मंत्र्याचा दावा

सांगोला : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उद्धवस्त करुन शरद पवार यांचे राजकारण संपविणार, असे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सांगोला येथे माढा लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांच्यासह सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि आ. प्रशांत परिचारक उपस्थित होते.

शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘शरद पवार यांचा जीव बारामती, माढा, कोल्हापूर आणि सातारा या चार मतदार संघांमध्ये आहे. शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात. यंदा हे चारही मतदारसंघ भाजप जिंकणार आहे. यामुळे शरद पवारांना दिल्‍लीत राहण्यासाठी घर शोधावे लागेल. गतवेळेच्या निवडणुकीत विरोधात असणारे मोहिते-पाटील कुटुंबिय व अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यंदाच्या निवडणुकीत महायुतीसोबत आहेत. माढा मतदार संघातून पराभवाची चाहूल लागल्यामुळेच शरद पवार यांनी माघार घेत संजय शिंदे यांना बळीचा बकरा बनविला आहे.’

मला निवडणुकीत जिंकून द्या. आपण सर्व दुष्काळी भागातील पाण्यासाठी लढणारी लोकं आहोत, असं आवाहन यावेळी भाजपचे माढाचे उमेदवार रणजीत निंबाळकर यांनी नागरिकांना केलं.

माढ्यातील राजकीय घडामोडी –

बहुचर्चित माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली आणि माढ्याचा तिढा वाढला. त्यानंतर माढ्यात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. भाजपाबरोबर असलेल्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली तर काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली.