राज्यपाल कोश्यारींना शरद पवारांचे ‘पुणेरी’ टोमणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या ‘काॅफी टेबल बूक’ ची पोच पावती देताना शरद पवार यांनी खास पुणेरी शैलीत त्यांना टोमणे मारले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररुप कॉफी टेबल पुस्तक शरद पवार यांना पाठवले होते.

पत्रात शरद पवार म्हणतात “भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कोफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद.”

“आपल्या मर्यादित कालावधीतील एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यांसारखे सोहळे, उच्चपदस्थ अभ्यागतांच्या – मान्यवरांच्या भेटीगाठी, इतर सामाजिक – सांस्कृतिक कार्यक्रम वर त्यातील आपल्या सहभागाची छायाचित्रे पाहण्यात आली. तसेच निधर्मवादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही”

काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्यातली मंदीरे सुरु करण्याबाबत लिहिले होते. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वाबद्दल शंका उपस्थित केली होती. या पत्राला तेवढ्याच तिखट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले होते. शरद पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली होती. “मी १९५७ पासूनचे सर्वच राज्यपाल पाहिले आहेत. १९६७ पासून प्रत्येक राज्यपालांचा थेट संबंध आला आहे. राज्यामध्ये या पदाला एक वेगळे महत्व आहे. सर्वांनीच या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे राज्यपाल पद महत्वाचे आहे, त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री हे पदही महत्वाचे आहे. त्याचीही प्रतिष्ठा राज्यापालांनी राखली पाहिजे,” असे पवार म्हणाले होते.

”राज्यपालांनी मुख्यमंत्र्याविषयी केलेली भाषा पदाची प्रतिष्ठा वाढविणारी नाही. त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा ठेवली जात नसेल तर तेही चुकीचे आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री जर याबाबात स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत असतील आणि त्यानंतरही ते त्याच जागेवर बसणार असतील तर त्यांनी बसावे, पण, ज्यांना थोडाजरी सेन्स आहे, असा माणूस या जागेवर बसणार नाही, मराठी भाषेत एक म्हण आहे,`शहाण्याला शब्दांचा मार` पुरेसा असतो,” असा टोला पवारांनी राज्यपालांना लगावला होता.