गेल्या २२ वर्षांपासून शरद पवारांचं रक्षक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या २२ वर्षांपासून शरद पवारांच्या सुरक्षेसाठी कायम सावलीप्रमाणे सोबत असणारे महेश तपाडे (Mahesh Tapade) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात कार्यरत होते. शरद पवारांच्या प्रत्येक दौऱ्यात आणि प्रवासात महेश तपाडे हे कायम सोबत होते. महेश तपाडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील माहिम येथील रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या २२ वर्षांपासून महेश तपाडे हे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मुंबईतील जेजे रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार या सुद्धा होत्या. तसंच खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा जेजे रुग्णालयातच कोरोनाची लस घेतली होती. यावेळी पवार यांच्यासोबत संपूर्ण सुरक्षापथक सोबत होते. महेश तपाडे हे नाशिक येथील रहिवासी आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार हे त्यांच्या मूळ गावी होणार आहे. महेश तपाडे यांच्या निधानामुळे सुरक्षारक्षक सहकाऱ्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.