पर्रिकरांबाबत शरद पवारांचे ‘ते’ वक्तव्य अयोग्यच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राफेल खरेदीचा व्यवहार माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना अमान्य होता, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असे विधान शरद पवार यांनी केले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत राफेल खरेदी प्रकरणावर शरद पवारांनी केलेलं विधान अयोग्य असल्याची टीका केली आहे.

शरद पवार यांनी केलेल्या विधानावर प्रश्न विचारला असता शरद पवारांनी हे विधान करण्याची गरज नव्हती असे भाष्य मुख्यमंत्र्यांनी केले. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर असे वक्तव्य करणे अयोग्य आहे. मनोहर पर्रिकर असते तर याच उत्तर त्यांनी दिलं असत. मात्र राहुल गांधी यांनीही याआधी असेच काहीसे बोलण्याचा प्रयत्न केला होता. मृत्यूच्या आठ दिवस आधी मनोहर पर्रिकर बोलले होते. जर मला संधी मिळाली तर मोदींच्या किमान दोन प्रचारसभा तरी घेईन कारण असा पंतप्रधान देशाला परत मिळणार नाही.

कोल्हापूरमधील एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राफेल करारावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. राफेल खरेदी व्यवहारात गैरप्रकारची तक्रार झाली. विमानांच्या किंमती तीन वेळा बदलण्यात आल्या. हा सर्व व्यवहार तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पटला नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि गोव्याचे मुख्यमंत्री होणे पसंत केल्याचे शरद पवार म्हणाले होते.