400 जणांना कोट्यवधींचा गंडा घालून शेअर ब्रोकर ‘गायब’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी तुमचे पैसे गुंतवून १८ ते २२ टक्के परतावा देतो, असे सांगून जवळपास ४०० जणांची कोट्यवधीची फसवणूक करुन शेअर ब्रोकर फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खडक पोलिसांनी महेशकुमार भगवानदास लोहिया (रा. शिवसागर रेसिडेन्सी, सिंहगड रोड) आणि वीमा एजंट सुनिल पुरुषोत्तम सोमाणी (रा. रविराज हेरिटेज, बोपोडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवार पेठेतील शिवकन्या अँड शिवकन्या इन्व्हेस्टमेंट येथे नोव्हेंबर २०१६ ते २१ सप्टेंबर २०१९ दरम्यान घडला आहे. शेकडो लोकांची फसवणूक केल्यानंतर या दोघांनीही आपले मोबाईल बंद केले असून त्यांचे शुक्रवार पेठेतील ऑफिस बंद करुन ते फरार झाले आहेत.

याप्रकरणी पिंपळे निलख येथील एका ५१ वर्षांच्या महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ओळखीतून अनेकांनी सुनिल सोमाणी यांच्याकडून विमा पॉलिसी घेतल्या आहेत. अशा वीमा पॉलिसी घेतलेल्यांना सोमाणी याने महेशकुमार लोहिया हे शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे गुंतवून तुम्हाला चांगला परतावा देतील, असे सांगून त्यांच्याशी संपर्क करुन देत होते. लोहियाने दीर्घ मुदतीसाठी तुमचे पैसे गुंतवितो, असे सांगून त्यांना १८ ते २२ टक्के परतावा मिळेल, असे आश्वासन देत होता. या महिलेने आपल्याकडील १० लाख रुपये त्याच्याकडे गुंतविले. लोहिया याने त्यांना त्यांच्या खात्याची खोटी माहिती देऊन तुमचे पैसे वाढत असल्याचे सांगत असे. प्रत्यक्षात त्याने ते १० लाख रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले. शेअर मार्केटमध्ये पैसे न गुंतविता २५ लाख रुपयांची फसवणूक केली.

गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे फोन बंद असून त्यांचे ऑफिसही बंद आहेत. ते लक्षात आल्यावर या महिलेप्रमाणेच आणखी १८ जणांनी खडक पोलिसांकडे धाव घेतली असून त्यांनीही आपली फसवणूक केल्याची तक्रार दिली. त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत ७ कोटी ६ लाख ३४ हजार ३३२ रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या दोघांनी सुमारे ४०० जणांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Visit :- policenama.com