शेअर बाजार : 2919 अंकानं कोसळला सेन्सेक्स, दिवसभरात बुडाले 11.25 लाख कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस, कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण आणि जागतिक शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानंतर गुरुवारी देशांतर्गत इक्विटी बाजारात ऐतिहासिक घट नोंदविली गेली. गुरुवारी व्यापार सुरू झाल्यापासून दोन्ही प्रमुख निर्देशांकात जबरदस्त विक्री झाली. दिवसभरातील कामकाजानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2919 अंक म्हणजेच 8.18 टक्क्यांनी घसरून 32,778 च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) मधील निफ्टी 50 देखील 868 म्हणजेच 8.35 टक्क्यांच्या घसरणीसह 9,590 च्या पातळीवर बंद झाला. दुपारी व्यापाराच्या दरम्यान एक वेळ अशी होती कि, सेन्सेक्समध्ये 3,100 अंकांची घसरण नोंदविली गेली.

एका दिवसात 11.25 लाख कोटी बुडले :
जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत देशांतर्गत बाजारात मोठी घसरण झाली आहे. 20 जानेवारी 2020 रोजी बीएसई सेन्सेक्स 42,273 गुणांसह उच्च स्तरावर होता. त्याशिवाय एनएसईचा निफ्टी 50 देखील 12,430 गुणांसह सर्व उच्च पातळीवर होता. परंतु यानंतर आतापर्यंत सेन्सेक्समध्ये 16 टक्क्यांनी आणि निफ्टीमध्ये 19 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर केवळ गुरुवारी दिवसभर चाललेल्या व्यवसायात गुंतवणूकदारांचे 11.25 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

कच्च्या तेलाच्या किमतीत 6 टक्क्यांनी घसरण :
गुरुवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत 6 टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदल्या दिवशी युरोपच्या प्रवासाला बंदी घातली आहे. त्यानंतर ब्रेंट क्रूडची किंमत 6 टक्क्यांनी घसरून 33.77 डॉलर प्रति बॅरलवर गेली आहे. दरम्यान, बाजारातील वाढती अनिश्चितता पाहता परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारही विक्री करीत आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार एफआयआयच्या माध्यमातून 3,515.38 कोटी रुपयांचे शेअर्स विकले गेले आहेत. मासिक आधारावर आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 20 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे काढले आहेत.

युरोपियन देशांमधील प्रवासावर 1 महिन्यासाठी बंदी :
दुसरीकडे, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेने ब्रिटन वगळता इतर युरोपियन देशांमधून प्रवास एक महिन्यासाठी थांबविला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे स्पष्ट केले की, आता आर्थिक संकटासारखी कोणतीही परिस्थिती नाही. त्याचबरोबर डब्ल्यूएचओने कोरोनाला साथीचा रोग म्हणून जाहीर केले आहे. कोरोनामधून आतापर्यंत सुमारे 4300 लोक मरण पावले आहेत. हा विषाणू 100 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. आर्थिक मंदी रोखण्यासाठी ब्रिटनने 39 आणि ऑस्ट्रेलियाने 17 अब्ज डॉलर्सचे मदत पॅकेज जाहीर केले.