UGC ची विद्यापीठांना सूचना, म्हणाले – ‘नव्या वर्षात मिश्र अभ्यास पद्धतीचा अवलंब करा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाने देशातील उच्च शिक्षण व्यवस्थाच विस्कळीत झाली असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण संस्थांना सामायिक किंवा मिश्र शिक्षण पद्धती अवलंबण्याची शिफारस केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर यूजीसीने तज्ज्ञ समितीद्वारे सामायिक शिक्षण अध्यापन पद्धतीच्या मार्गदर्शक सूचनांचा आराखडा तयार केला आहे. दरम्यान सामायिक शिक्षण पद्धतीमध्ये अभ्यासक्रमातील 60 टक्के भाग प्रत्यक्ष पद्धतीने, 40 टक्के भाग ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याबाबत यूजीसीने सुचवले आहे. मसुद्यावर 6 जूनपर्यंत हरकती-सूचना मागवण्यात आल्या आहेत.

यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. सामायिक शिक्षण पद्धत म्हणजे केवळ ऑनलाइन शिक्षण अन् प्रत्यक्ष शिक्षण यांचे मिश्रण नाही, तर या दोन्ही पद्धतींचा नियोजनपूर्वक मिलाफ, अर्थपूर्ण कृती असल्याचे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे. सामायिक शिक्षण पद्धतीसाठी ईप्सित हे प्रारूप प्रस्तावित केले आहे. या प्रारुपामध्ये शिक्षणासाठीचे स्रोत शोधून विद्यार्थी केंद्रित उपक्रम, विद्यार्थ्यांना स्रोत उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना आवश्यक मदत करणे, अध्ययन अध्यापनातील त्रुटी ओळखून त्या दूर करणे आणि चाचणी घेणे यांचा समावेश आहे. 21 व्या शतकातील आवश्यक कौशल्ये शिकण्यासाठी मिश्र शिक्षणपद्धती महत्त्वाची असून, त्याची काळजीपूर्वक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सामायिक शिक्षणात शिक्षकाची भूमिका ज्ञान देणाऱ्यापासून प्रशिक्षक, मार्गदर्शकापर्यंत विस्तारली आहे. त्यामुळे शिक्षकांची भूमिका अधिक महत्त्वाची, प्रभावी असल्याचे स्पष्ट केले आहे.

उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरांत अध्ययन-अध्यापनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याची शिफारस नव्या शिक्षण धोरणात आहे. अध्ययन अध्यापनातील मिश्र पद्धतीमुळे मूल्यमापनासाठी वेगळा विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाला विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी प्रोत्साहन द्यावे. ओपन बुक एक्झाम, समूह परीक्षा, तोंडी परीक्षा, मागणीनुसार परीक्षा, ऑनलाइन प्रश्नमंजूषा अशा पद्धती वापरता येऊ शकते असे मसुद्यात नमूद केले आहे.