‘लक्ष्मी विलास बँके’चे शेअर कोसळले, तीन दिवसांत बँकेच्या स्टॉक्स मध्ये 50 टक्क्यांहून अधिक ‘घसरण’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आरबीआय (RBI) च्या निर्बंधांचा सामना करत असलेल्या लक्ष्मी विलास बँके (Lakshmi Vilas Bank) च्या शेअरमध्ये घट दिसून येत आहे. केंद्र सरकारने लक्ष्मी विलास बँकेला 16 डिसेंबरपर्यंत मोरोटोरियम वर ठेऊन आणि डीबीएस बँके (DBS Bank) मध्ये विलीन केल्याच्या वृत्तानंतर शेअर बाजारामध्ये लक्ष्मी विलास बँकेचे शेअर्स कोसळले आहेत. वास्तविक, या विलीनीकरणानंतर लक्ष्मी विलास बँकेच्या शेअर होल्डर्सना काहीही मिळणार नाही, कारण लक्ष्मी विलास बँकेचे जे काही पेड अप शेअर कॅपिटल आहेत, त्यांना पूर्णपणे राईट-ऑफ (Write off) केले जाईल. या वृत्तामुळे शेअर धारकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांना शेअर्स विकून यातून सुटका करून घ्यायची आहे, परंतु एलव्हीबी (LVB) शेअर्सना कोणताही खरेदीदार मिळत नाही.

शुक्रवारी एका शेअरची किंमत 9 रुपयांवर आली

गेल्या तीन दिवसांत शेअर बाजारात लक्ष्मी विलास बँकेच्या शेअर्सच्या किमतींमध्ये 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. शुक्रवारी एका शेअरची किंमत 9 रुपये झाली, जी मंगळवारी 16 रुपयांच्या आसपास होती. बुधवारी बँकेच्या शेअर्सच्या किंमती 20 टक्क्यांनी, गुरुवारी 20 टक्क्यांनी आणि शुक्रवारी 10 टक्क्यांनी घसरल्या आहेत. लक्ष्मी विलास बँकेचे शेअरहोल्डर्स आणि प्रवर्तकांनी बँकेच्या विलीनीकरणाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. बँकेच्या प्रवर्तकांचे म्हणणे आहे की बँकेजवळ इतके पैसे आहेत की ठेवीदारांचे संपूर्ण पैसे परत केले जाऊ शकतात. जर आरबीआयने आपल्या निर्णयावर पुनर्विचार केला नाही तर लक्ष्मी विलास बँकेचे प्रवर्तक आणि शेअरहोल्डर्स आरबीआयच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात धाव घेतील.

सध्या लक्ष्मी विलास बँकेचा नेटवर्थ निगेटिव्ह

लक्ष्मी विलास बँक आणि डीबीएस बँकेच्या विलीनीकरणासाठी आरबीआयने जी ड्राफ्ट स्कीम तयार केली आहे, त्यानुसार या विलीनीकरणानंतर लक्ष्मी विलास बँकेचा जो काही पेड अप शेअर कॅपिटल म्हणजेच कंपनीचे एकूण शेअर आहेत, त्यांना पूर्णपणे राईट-ऑफ करण्यात येईल. ते पूर्णपणे संपुष्टात येतील. त्याचा तोटा लक्ष्मी विकास बँकेच्या इक्विटी शेअरधारकांना होईल. आरबीआयने सांगितले की लक्ष्मी विलास बँकेची निव्वळ मालमत्ता सध्या नकारात्मक आहे. अशा परिस्थितीत बँकेच्या इक्विटी शेअरधारकांना पैसे मिळणार नाहीत आणि बँकेची व्हॅल्यू झिरो मानली जाईल. रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे की, सरप्लस आणि सिक्युरिटी प्रीमियरसह पेड अप शेअर्स कॅपिटल आणि बँकेचा साठादेखील राईट ऑफ केला जाईल.