न्यायालयातून बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, म्हणाले – ‘त्या उस्मानीला पुण्यातच चोपायला हवं होतं’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सशर्त पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना शनिवारी जामीन मंजूर करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे स्वत: न्यायालयात हजर राहिले होते. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. तर पुणे आणि दिल्लीच्या घडामोडींचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यावेळी पुण्यात शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये झालेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. तेव्हा म्हणाले, शर्जील उस्मानीला कुणी हे बोलायला लावलंय का? कारण सध्या राज्यात अशाच पद्धतीचं राजकारण सुरु आहे. कुणाला तरी बोलायला लावायचं आणि त्यावर मग राजकारण करायचं, अशा शब्दांत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने जो कायदा आणलेला आहे तो कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असतील. त्या-त्या राज्यातल्या सरकारांशी त्यांच्या कृषी धोरणांनुसार केंद्र सरकारने समन्वय साधून कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये सर्व नियंत्रण जाऊ नये हीच देशवासियांची इच्छा आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच, चीन-पाकिस्तानच्या सीमेवरही इतका कडेकोट बंदोबस्त नसेल इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची काहीही आवश्यकता नाही. शेतकरी आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असताना पंतप्रधानांनी लक्ष घालून प्रश्न मिटवायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच पुढे ते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेची ज्यावेळेस केंद्रात-राज्यात सत्ता होती तेव्हाच ‘संभाजीनगर’ हे नामांतर का नाही झालं? देशातल्या अनेक शहरांची, दिल्लीतल्या रस्त्यांची नावं बदलली गेली. पण औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं ? ह्याचं उत्तर भाजप-शिवसेनेने द्यावं, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे.