‘ऑल ऑऊट’मध्ये पुण्यातील चौघे घातक हत्यारांसह नाशिक पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसानामा ऑनलाईन – मुथुट फायनान्सवर दरोडा टाकल्यानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान एका लॉजवर छापा टाकला त्यात पुण्यातील ४ जणांना धारदार शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले आहे. सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या चौघांना शनिवारी रात्री ताब्यात घेतले.

निखील उमाकांत तावरे (वय २२, रा. शास्त्रीनगर), शुभम संदिप उत्तेकर (वय १८, रा. गांधीनगर), अक्षय लोले (वय २२, रा. शास्त्रीनगर), दत्ता नारायण गिरे (वय २५, रा. टिंगरेनगर) अशी चौघांची नावे आहेत.

कोणती हत्यारे सापडली?
कुकरी, मोठा लांब चाकू अशी हत्यारे या चौघांच्या बॅगेत सापडली.

दरोड्यानंतर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

नाशिकच्या उंटवाडीतील मुथुट फायनान्सवर दरोडा टाकत गोळीबार करण्यात आला. त्यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशाने शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान दरोडेखोरांच्या बाईक्स पोलिसांना सापडल्या आहेत.

कोठे सापडले चौघे ?

सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. त्यावेळी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांच्यासह गुन्हे शोध पथकाने सीबीएसजवळील हॉटेल पद्मामध्ये तपासणी केली. त्यावेळी या हॉटेलच्या २०९ क्रमांकाच्या रुममध्ये चौघे होते. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांच्या बॅगांची झडती घेतली. त्यावेळी बॅगेत कुकरी, मोठा चाकू अशी धारदार हत्यारं मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

नाशकात फिरण्यासाठी आले होते चौघे

चौघांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर ते चौघे नाशिकमध्ये फिरण्यासाठी आली होती. तर पुण्यात त्यांची भांडणं झाली होती. त्यामुळे ते नाशिकला आले होते. सरकारवाडा पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याविरोधात कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे सांगण्यात आले.