Coronavirus : आनंद महिंद्रा यांच्याकडून 100 % वेतनासह विविध मदतीची घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. या संकटावर मात करण्यासाठी देशातील पहिले उद्योगपती म्हणून आनंद महिंद्रा हे पुढे आले आहेत. व्हेंटिलेटर्स बनवण्यापासून रिसॉर्ट्स देण्यासह स्वतःचे 100 टक्के वेतनही मदत म्हणून देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियातून त्यांचे कौतुक होत आहे.

आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनीही महिंद्रांचं कौतुक केले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी कोरोना संकटामुळे देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे याचा फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असल्याचे त्यांनी काल ट्विटरवरुन जाहीर केले आहे. देशाच्या व्यवसाय क्षेत्राला महिंद्रा यांच्यासारख्याच दूरदृष्टी-नि: स्वार्थी नेतृत्वाची गरज असल्याचे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. मी आनंद महिंद्रांना किशोरवयीन असताना हार्वर्डमध्ये शिक्षण घेत होते तेव्हापासून ओळखतो आहे. पण हे ट्विट वाचण्याआधी मला त्यांचा इतका अभिमान कधीही वाटला नव्हता. आपल्या देशाला व्यवसाय क्षेत्रासह, जीवनातही अशाच दूरदृष्टी नि: स्वार्थी नेतृत्वाची गरज आहे. शाबाश!.अशा आशयाचे ट्विट थरुर यांनी केले आहे.

महिंद्रा यांनी रविवारी एकापाठोपाठ पाच ट्विट करुन , तज्ज्ञांनुसार भारत कोरोना संकटाच्या तिसर्‍या टप्प्यात पोहोचलाय किंवा तिसर्‍या टप्प्याच्या अगदी दारात उभा आहेत्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत काही पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. काही आठवडे लॉकडाउन हाच उत्तम पर्याय आहे . त्यामुळे वैद्यकीय सेवेवरील दबावही थोडा कमी होईल. पण, आपल्याला अजून बरीच तात्पुरती रुग्णालये तयार करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यामुळे आमच्या उत्पादन सुविधांद्वारे व्हेंटिलेटर्स बनवण्यासाठी काय करावे लागेल यावर महिंद्रा ग्रुप तातडीने काम सुरु करेल आम्ही तात्पुरती काळजी सुविधा केंद्र म्हणून आमच्या महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्ट्स ऑफर करण्यास तयार आहोत. आमची प्रोजेक्ट टीम तात्पुरती काळजी सुविधा केंद्र उभारण्यात शासन / सैन्यदलास मदत करण्यास तयार आहे. कोरोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असून, त्यात मी माझे 100 टक्के वेतन मदत म्हणून देईल, तसेच आम्ही आमच्या सहयोगींनाही या निधीमध्ये स्वेच्छेने योगदान देण्यास प्रोत्साहित करू असे त्यांनी जाहीर केले आहे.