विधानपरिषद निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून ‘या’ दोघांना उमेदवारी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या गोटात हालचाली सुरु आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपनंतर आता राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना विधानपरिषद निवडणुकीसाठीचे उमेदवारी देण्यात आली आहे.

शशिकांत शिंदे सातारा आणि अमोर मिटकरी अकोला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार असणार आहेत. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची माला खात्री आहे, असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार ओबीसी तर दुसरा मराठा समाजातील आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील उमेदवार देवून राष्ट्रवादीने जातीय तसंच प्रादेशिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.

9 जागांसाठी 10 उमेदवार
काँग्रेसने आपल्या दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्यामुळे आता विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात असणार आहेत. उद्यापर्य़ंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून 14 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेता तर ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. अन्यथा निवडणूक अटळ आहे.

कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार ?
राष्ट्रवादी काँग्रेस – शशिकांत शिंदे, अमोर मिटकरी
काँग्रेस – राजकिशोर मोदी आणि राजेश राठोड
शिवसेना- उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे
भाजप – डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते-पाटील