‘या’ दिवशी शत्रुघ्न सिन्हा करणार काँग्रेसमध्ये प्रवेश ; रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात मैदानात

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपने पत्ता कट केल्यानंतर बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा २८ मार्चला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस नेते अखिलेश प्रसाद सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले, “शत्रुघ्न सिन्हा २८ मार्चला सकाळी ११.३० वाजता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांचा भाजपनं पत्ता कट केल्यानंतर काँग्रेस त्यांच्या संपर्कात होता. २८ मार्चला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत शत्रुघ्न सिन्हा पक्षात प्रवेश करणार असून, पटना साहिबमधून ते रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.”

दरम्यान, गेल्या आठवड्यात भाजपानं बिहारमधील एनडीएच्या ४०- उमेदवारांची नावं जाहीर केली होती. ज्यात पटना साहिबमधून भाजपनं रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे.

२०१४ ला मोदी सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा वारंवार भाजपविरोधात बोलत आले. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपत नाराज असल्याचे दिसत आहे. त्यांनी अनेकदा राफेल मुद्द्यावरून मोदींवर निशाणा साधला आहे. शत्रुघ्न यांनी राफेल करारातील सहभागारसंदर्भातही प्रश्न उपस्थित केले होते. शत्रुघ्न यांनी ट्विट करत मोदींना इशारा देत पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. ‘मोहब्बत करने वाले कम न होंगे, (शायद) तेरी महफिल में लेकिन हम न होंगे,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.