धक्कादायक ! नगरमध्ये पुन्हा ‘ऑनर किलिंग’ ; आंतरजातीय विवाह केल्यामुळे पोटच्या मुलीची हत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – जामखेड येथील ‘ऑनर किलिंग’ची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात दुसरी एक घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीची आई-वडिलांनीच हत्या केल्याचा आरोप मयताच्या पतीने केली आहे. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात आई-वडिलांविरुद्ध खून करून पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रतिभा देवेंद्र कोठावले (वय 24) हे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील ब्रह्मदेव रमाजी मरकड, आई आशा ब्रह्मदेव मरकड (दोघे रा. कौठा, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. याप्रकरणी मयत प्रतिभाचे पती देवेंद्र प्रकाश कोठावले (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत प्रतिभा व देवेंद्र कोठवले यांचा अांतरजातीय विवाह झालेला होता. सदर विवाहाला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. 23 एप्रिल रोजी प्रतिभा नेवासा तालुक्यातील कौठा येथे माहेरी गेली होती. बुधवारी (दि. 24) रात्री नऊ ते गुरूवारी (दि. 25) दीड वाजण्याच्या दरम्यान तिच्या आईवडिलांनी आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून प्रतिभाचा निर्घुण खून केला. घरासमोरच घाईत अंत्यविधी केला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. मृत्यूनंतर तातडीने अंत्यविधी झाल्याने मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊ शकली नाही.

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून ही हत्या केल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. त्यावरून पोलिसांनी मयताचे आई-वडिलांविरुद्ध पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चवळी हे करीत आहेत.