‘मी क्रिकेटर आहे हे तिला माहितच नव्हतं’, हार्दिकनं सांगितली साखरपुडयाची गोष्ट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची मैत्रिाण नताशा स्टॅन्कोविच यांचे प्रेमप्रकरण चर्चेत आहे. नताशा आणि हार्दिक हे आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी हार्दिकने सोशल मीडियावरून दिली होती. या दोघांनी घरच्या घरी गुपचूप लग्न उरकल्याचीही चर्चा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिकने त्याच्या नताशासोबत पहिल्यांदा भेट कशी झाली आणि सरप्राइज साखरपुड्याची माहिती दिली आहे.

आमची पहिली भेट खूप विचित्र होती. म्हणजे मी खूप वेगळा आहे, असे तिला वाटले होते. त्यावेळी डोक्यावर टोपी, गळ्यात चेन आणि हातात घड्याळ असा माझा लूक होता. रात्री एक वाजता आमची पहिल्यांदा भेट झाली. हा कोणीतरी अत्यंत वेगळ्या स्वभावाचा माणूस दिसतोय, असे तिला वाटले. त्यावेळी पहिल्यांदा आम्ही एकमेकांशी बोलू लागलो होतो. त्यानंतर मैत्री झाली. हळूहळू बोलणे वाढले आणि आम्ही डेट करू लागलो. 31 डिसेंबर रोजी आम्ही साखरपुडा केला. विशेष म्हणजे नताशाला हार्दिकबद्दल काहीच माहित नव्हते. तो क्रिकेटर आहे हेसुद्धा तिला ठाऊक नव्हते. 31 डिसेंबर रोजी साखरपुडा झाल्यानंतर 1 जानेवारी रोजी दोघांनीही सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले.

आई-वडिलांना त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. साखरपुड्याच्या दोन दिवस आधी मी कृणालला सांगितले होते. मी ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो, ती व्यक्ती मला भेटली आहे आणि तिच्यासोबत राहून मी चांगला व्यक्ती बनत चाललो आहे, असे त्याला सांगितले होते. सरप्राइज साखरपुड्यानंतर आईवडिलांनीही साथ दिली. तुला जे योग्य वाटते ते कर असे ते म्हणाले होते. त्यानंतर 31 मे रोजी हार्दिक पांड्याने नताशासोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली. ‘मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा सार्‍यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत,’ असे त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.