‘ती’ मलाही मेसेज अन् कॉल करायची…भाजपा नेत्याचे रेणू शर्मावर गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे(NCP) नेते आणि महाविकास आघाडी( Mahavikas Aghadi) सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पेटलं आहे. असे असतानाच आता प्रकरणात मोठी घडामोड घडली असून याला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण आता भाजपाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ती मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. तसेच सातत्याने मला रिलेशनशिपसाठी बळजबरी करत होती. मी नकार देऊनही शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. मात्र, मी त्यांना भेटायचे टाळले, असे खळबळजनक आरोप हेगडे यांनी केले आहेत. त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांना सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे.

भाजप नेते हेगडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रेणू शर्मा यांनी मला देखील रिलेशनशिपच्या हनीट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल अन् मेसेज करत होती. तसेच सातत्याने मला रिलेशनशिपसाठी बळजबरी करत होत्या. मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला मिळाली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे.

हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन क्रमांकावरून त्यांना संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. मी त्या महिलेला भेटण्यात अजिबात इंटरेस्ट नाही असे स्पष्ट सांगितले असल्याने त्यांच्या मागणीनुसार रिलेशनशीप ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी 6 आणि 7 जानेवारी 2021 रोजीही तिने मला WhatsApp मेसेज केले. मी थंब अपचा इमोजी पाठवण्याशिवाय काहीच रिप्लाय दिला नाही अशी माहिती देखील कृष्णा हेगडे यांनी पत्रात दिली आहे. दरम्यान आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत.