शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीची आर्थर रोड जेलमधून 4 वर्षानंतर जामीनावर सुटका

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शीना बोरा हत्याकांडामध्ये सबळ पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने पीटर मुखर्जीला 6 फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दादच न मागितल्याने मुखर्जीची शुक्रवारी सुटका करण्यात आली आहे.
सावत्र मुलगी शीना बोरा हिच्या हत्याकांडात सामिल असल्याच्या आरोपाखाली पीटरला चार वर्षांपूर्वी अटक झाली होती.

मात्र या प्रकरणात पीटरचा थेट सहभाग असल्याचे सबळ पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं पीटर मुखर्जीला6 फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयने याला जोरदार विरोध करीत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ मागितली होती. त्यावेळी हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी या निर्णयाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली होती. मात्र सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दादच न मागितल्याने अखेरीस पीटर मुखर्जीची शुक्रवारी सुटका करण्यात आली.

याआधीही अनेकदा पीटरने केलेला जामीनासाठीचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने पीटरला तात्पूरता जामीन मंजूर केला होता. प्रकृती अस्वस्थ्याचे कारण लक्षात घेत पीटरला त्याच्या पसंतीच्या खाजगी रूग्णालयात 15 दिवसांसाठी दाखल करण्यास हायकोर्टाने परवानगी दिली होती. विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं पीटरने हायकोर्टात अर्ज केला होता.

तपासयंत्रणेकडे आपल्याविरोधात सबळ पुरावे नाहीत, असा पीटरचा या याचिकेत दावा होता. पीटर मुखर्जीला 16 मार्च 2019 ला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर कोर्टाच्या संमतीने त्याला शस्त्रक्रियेसाठी खासगी रूग्णालयात हलवण्यात आले होते. तेव्हापासून पीटर मुखर्जीची प्रकृती काहीशी नाजूकच आहे. शीना बोरा ही इंद्राणीची मुलगी असून तिची हत्या साल 2012 मध्ये इंद्राणीने घडवून आणल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. या कटाची संपूर्ण माहिती इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही होती, असा सीबीआयचा आरोप आहे.