डॉ. विकास बाबा आमटे यांचं भाविनक ट्विट, म्हणाले – ‘आज तू हवी होतीस शीतल…’

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात व डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांनी ३० नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. मृत्युपरांत शीतल आमटे यांचा पहिलाच जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनी लेकीच्या आठवणी जागवत डॉ. विकास आमटे यांनी एक भावनिक ट्विट केलं आहे.

ट्विट करत डॉ. विकास आमटे म्हणाले, “आज शीतलचा वाढदिवस. आज तू हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे म्हणत शीतल यांच्यासोबतचा आपला फोटो त्यांनी शेअर केला आहे.

आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूला ३० जानेवारी रोजी २ महिने पूर्ण होत आहेत. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात श्वास अडकल्याने (चोकिंग) त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. पोलीस तपास सुरू असून, तपासात घातपात झाल्याचा प्रथमदर्शनी पुरावा दिसलेला नाही. अद्यापही सायबर व फॉरेन्सिक अहवाल आलेले नसून ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक स्पष्टता होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

दरम्यान, शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी सुद्धा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शीतल यांचे स्मरण केले. दुसरीकडे, आनंदवन त्याचसोबत शीतल यांचे सहकारी असणाऱ्या अनेक व्यक्तींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.