शेखर गायकवाड यांनी पुणे मनपा आयुक्त पदाचा पदभार स्विकारला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर विद्यमान आयुक्त सौरभ राव हे देखील साखर आयुक्त पदाची सूत्र हाती घेणार आहेत.

पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह 20 सनदी अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. येत्या 24 जानेवारीला महापालिकेचे अंदाजपत्रक सादर होत असताना आयुक्त राव हे किमान तोपर्यंत पदभार ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु राज्य शासनाच्या आदेशानुसार राव यांनी पदभार सोडण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी सव्वा वाजता नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, रुबल अग्रवाल, उपायुक्त राजेंद्र मुठे उपस्थित होते.

पालिकेचे 2020 – 22 चे अंदाजपत्रक तयार असून नवीन आयुक्तच ते सादर करतील हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात होणारी विशेष समितीची बैठक शुक्रवार पर्यंत पुढे ढकलण्यात आली. तसेच आंबील ओढा पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठीचीही बैठक शुक्रवार पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

पुणे महापालिकेत कामाचा चांगला अनुभव मिळाला. थेट नागरिकांशी संपर्क होत असल्याने समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. पुणेकर आणि सभागृहातील सदस्य, अधिकारी, कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभले असे सौरभ राव यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –