विक्रमाचे ‘शिखर’ सर

बंगळुरु:वृत्तसंस्था

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज कसोटी क्रिकेटचा नवा विक्रम रचला गेला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा सलामीवीर शिखर धवनने नवा विक्रम केला आहे. पहिल्या दिवशीच उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन हा जगातील सहावा, तर पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. धवनने अवघ्या ८७ चेंडूत शतक झळकावले आहे.

आणि… असा रचला विक्रम

भारत आणि अफगाणिस्तान संघांमधल्या या एकमेव कसोटीला आजपासून चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरुवात झाली आहे.या कसोटीत कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सलामीवीर धवन आणि मुरली विजयने सार्थ ठरवला. धवनने आधी 47 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मग त्याने धावगती वाढवत अवघ्या 87 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाला 18 चौकार आणि तीन खणखणीत षटकारांचा साज होता.

उपहारापूर्वी खेळ थांबला त्यावेळी भारताने 27 षटकात बिनबाद 158 धावा केल्या होत्या. मुरली विजय 72 चेंडूत नाबाद 41 तर शिखर धवन 91 चेंडूत 104 धावांवर खेळत होता.उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन पहिलाच भारतीय फलंदाज तर जगातील सहावा फलंदाज ठरला.

कोण आहेत उपहारापूर्वी शतक झळकावणारे खेळाडू

व्हिक्टर ट्रम्पर (ऑस्ट्रेलिया)
चार्ल्स मॅकार्टनी (ऑस्ट्रेलिया)
डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)
माजिद खान (पाकिस्तान)
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
शिखर धवन (भारत)