शिक्रापुर : सिलेंडरच्या स्फोटात 10 लाखांची रोकड व 40 तोळे सोने भस्मसात, वाघोली जवळील भावडी येथील घटना

शिक्रापुर – वाघोली ता.हवेली जवळील भावडी येथील घरामध्ये लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट होऊन घरात ठेवलेली १० लाखांची रोकड व ४० तोळे सोने जळाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. स्फोटामध्ये घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले असून वाघोली येथील पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भावडी गावठाण येथील भैरवनाथ मंदिराच्या समोर राहणारे बाळासाहेब दगडू तांबे हे पत्नीसह साडे अकराच्या सुमारास घर बंद करून वाघोली येथे कामानिमित्त गेले होते. घर बंद केल्यानंतर काही वेळाने त्यांच्या घरातून धूर निघत असून आग लागली असल्याची माहिती तांबे यांना फोनद्वारे कळाली. आग लागली असल्याचे समजताच ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले परंतु आग आटोक्याच्या बाहेर गेली होती. याचदरम्यान सिलेंडरचा स्फोटदेखील झाला.


घटनेची माहिती मिळताच वाघोली येथील पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे पथक देखील तात्काळ आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमनदलाचे उपस्थानक अधिकारी विजय महाजन, चालक संदीप शेळके, फायरमन सचिन गवळी, योगेश मायनाळे, मयूर गोसावी, विकास गायकवाड यांच्या पथकाने लागलेली आग आटोक्यात आणली. आगीमध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने आगीमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. यामध्ये १० लाख रुपयांची रोख रक्कम व ४० तोळे सोने जळाल्याने मालमत्ता नुकसानीसह मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पोलीस विभाग व गॅस कंपनीच्यावतीने पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे.