शिक्रापुर : मांडवगणला साप चावल्याने एका मुलाचा मृत्यू

शिक्रापुर : शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे साप चावल्याने एका १३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आदेश भुपेंद्र कुंभार ( वय १३) रा. मांडवगण फराटा असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर याप्रकरणी भूपेंद्र नरेश कुंभार वय 39 वर्षे रा. मांडवगण फराटा यांनी मांडवगण फराटा पोलीस दूरक्षेत्र येथे खबर दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार भुपेंद्र कुंभार हे आपल्या पत्नी व दोन मुलासह मांडवगण फराटा येथे राहत असून ते आपल्या दोन्ही मुलासह दि.१८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शेतातील पिकावर औषध मारण्यासाठी गेले होते.त्यावेळी भुपेंद्र यांनी औषध मारण्यासाठी लागणारे पाणी भरून झाल्यानंतर आदेश याला बोअरवेलची मोटर बंद करण्यास सांगितले.आदेश हा मोटर बंद करण्यास जात असताना तो मोठ्याने ओरडल्याने त्याला विचारले असता त्याने साप चावला असल्याचे सांगितले.व तो पाच मिनिटात बेशुद्ध पडला.पुढील उपचाराला त्याला मांडवगण फराटा येथील वरदविनायक हॉस्पिटलमध्ये आणले असता उपचारापुर्वीच तो मयत झाला होता.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस हवालदार श्रावण ग्रुपचे, पोलीस कॉन्स्टेबल किरण ढुके, अक्षय काळे हे करीत आहे.