शिक्रापुर : सर्पमित्रांकडून कृत्रिम पद्धतीने 8 सापाच्या पिलांना जन्म, सर्वत्र कौतुक

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथील सर्पमित्राने पकडलेल्या सापाने सर्पमित्राच्या घरात अंडी घातली असताना त्या आठ अंड्यातील पिलांना कृत्रिम पद्धतीने जन्म देण्यात वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांना यश आले असून नुकतेच सर्व पिलांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी रात्रीच्या सुमारास एक तस्कर जातीचा साप पकडला होता, सकाळच्या सुमारास सापाला सोडून देण्यासाठी घेऊन जाताना त्या सापाने नऊ अंडी घातली असल्याचे सर्पमित्रांना दिसून आले, त्यांनी तातडीने वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे संस्थापक विनायक बडदे यांना माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र शेरखान शेख व श्रिकांत भाडळे यांनी सर्व अंडी विशिष्ट अशा कृत्रिम पद्धतीने ठेवून दिली त्यांनतर वेळोवेळी त्याची पाहणी करत त्याबाबतची माहिती विनायक बडदे यांना दिली, अखेर तब्बल नव्वद दिवसांच्या नंतर त्यापैकी आठ अंड्यातून नुकतीच आठ पिल्ले सुखरूपपणे बाहेर आली आणि सर्पमित्रांच्या प्रयत्नांना यश आले.

त्यांनतर याबाबत शिरूर वनविभागाला माहिती देत सर्व पिल्लांना सुखरूपपणे वनविभागाच्या हद्दीत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले, यावेळी शिरूर वनविभागाचे कर्मचारी आनंदा हरगुडे, सर्पमित्र शेरखान शेख, सर्पमित्र श्रिकांत भाडळे, सर्पमित्र बाळासाहेब मोरे, शुभम यादव हे उपस्थित होते. तर सर्पमित्रां च्या प्रयत्नांना यश आल्याने सर्पमित्रांनी देखील समाधान व्यक्त केले.